चिपळूण : मार्गताम्हाने महाविद्यालयाच्या सहा मुली सहभागी झालेले कोळी नृत्य गिनिज बुकमध्ये

रामपूर : ‘सुवर्ण भारत वारसा आणि विकास’ या थीमवर आधारित यावर्षीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय संस्कृती मंत्रालय, भारत सरकार द्वारा दिल्ली कर्तव्यपथावर आयोजित विविध ५० प्रकाराच्या नृत्य कलाकारांमध्ये अथर्व वेद परंपरा कलामंच रत्नागिरी यांच्या सहाय्याने मार्गताम्हाने महाविद्यालयाच्या सहा मुलींनी कोळी नृत्य प्रकारात सहभाग घेतला. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.
भारत सरकारच्या केंद्रीय संस्कृती मंत्रालयाद्वारे ‘जयती जय मम भारतम २०२५’ या मुख्य थीमवर आधारित कला नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ६० कलाकारांनी यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा कोळी नृत्याचे प्रदर्शन केले. रत्नागिरीतील अथर्ववेद परंपरा कला मंच रत्नागिरी यांच्या सहाय्याने मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी, मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रथम व तृतीय वर्षामध्ये शिकत असणाऱ्या प्रगती घडशी, नेहा कोतवडेकर, तन्वी मोहिते, भक्ती गुजर, समृद्धी गुजर व अंकिता पवार या विद्यार्थांनी कर्तव्यपथावरील पाच हजार कलाकारांमध्ये सहभाग नोंदवत एक महिनाभरापासून अथक परिश्रम घेत कोळी नृत्याचे सादरीकरण केले.
या नृत्याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रभो सुभान्तो व त्यांच्या टीमने संपूर्ण कलाकारांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराबद्दल मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्याक्ष मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष जयसिंग मोरे, सर्व संचालक पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश सुतार, सांकृतिक विभाग प्रमुख प्रा. विक्रांत टेरवकर, अथर्व वेद परंपरा कलामंचचे लक्ष्मण पडवळ, प्रथमेश कोतवडेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपूर्ण मार्गताम्हाने, चिपळूण तालुक्यातील नागरिकांनी या विद्यार्थिनीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 30/Jan/2025
