मुंबई – गेल्या महिन्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होणार, याचा शिव आणि शंभूप्रेमींना मोठा आनंद झाला होता. पंरतु, याचा ट्रेलर रिलीज झाला आणि एका नव्या वादाला सुरुवात झाली. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशल आणि राणी येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिका मंदान्ना यांच्यावर चित्रीत झालेलं एक गाणं वादाचा कारण बनलं. खरंतर पारंपरिक लेझीम खेळतानाचं हे नृत्य होतं. परंतु हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि राणीसाहेब लेझीम खेळताना पाहणं शिवप्रेमींनी पसंत केलं नाही. हे दृश्य काढून टाकण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा प्रेक्षक आणि शिव तसंच शंभूप्रेमी संघटनांनी घेतला. अखेर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी माध्यमांसमोर पुढं येऊन, सिनेमातून हे दृश्य काढून टाकत असल्याचं आश्वासन दिलं. याचा परिणाम सकारात्मक झाला आणि या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं.
‘छावा’च्या तेलुगू ट्रेलरमध्ये लेझीम नृत्य – ‘छावा’ देशभर रिलीज झाला आणि सर्वच विभागातून याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं आतापर्यंत जगभरात ५६६.५० कोटी रुपये कमाई केली. मात्र, दक्षिणेतील राज्यांमध्ये हा सिनेमा हिंदी भाषेत रिलीज झाल्यानं स्थानिक लोकांची थोडीशी नाराजी पाहायला मिळाली. हा चित्रपट तेलुगू भाषेत डब करण्यात यावा अशी मागणी लोकांनी केली होती. अखेर मॅडॉक फिल्म्सनं याचा विचार केला आणि लोकेच्छेखातर ‘छावा’ चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी तेलुगूमध्ये प्रदर्शित करण्याचं जाहीर केलं. त्यानुसार ‘छावा’चा तेलुगू भाषेतील ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला असून यामध्ये छत्रपती संभाजी राजे लेझीम खेळत असलेलं दृश्य कायम ठेवण्यात आलं आहे.
पब्लिसिटी स्टंट आहे का? – हिंदी भाषेतील ‘छावा’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यातील लेझीम नृत्याच्या दृश्यावरुन वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत गेलं. राज ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर ट्रेलरमधील हे वादग्रस्त ठरु शकणारं लेझीम नृत्य वगळण्याचा निर्णय ‘छावा’ च्या निर्माता-दिग्दर्शकांनी घेतला. खरंतर त्या एका कारणानं ज्या लोकांनी ट्रेलर पाहिला नव्हता त्या लोकांनीही तो पाहिला. या निर्णयामुळे चित्रपटरसिकांच्या मनात नाही म्हटलं तरी सहानुभूती निर्माण झालीच. ‘छावा’ हा चित्रपट 2025 मध्या रिलीज झालेल्या चित्रपटांपैकी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या यशासाठी अनेक घटक कारणीभूत असले तरी लेझीम नृत्याच्या निमित्तानं मिळालेली प्रसिद्धीही एक महत्त्वाचा घटक ठरला होता. आता जेव्हा हा सिनेमा तेलुगूमध्ये रिलीज होतोय, तर लेझीम नृत्याचं दृश्य वगळणं निर्मात्यांना सहज शक्य होतं. मात्र त्यांनी तसं केलेलं नाही. इतकंच नाही तर इतका विरोध झाल्यानंतर चित्रपटातून दृश्य काढून टाकलं असलं तरी ‘छावा’च्या हिंदी ट्रेलरमध्ये ते लेझीम नृत्याचं दृश्य अद्यापही तसंच आहे. मॅडॉक ही चित्रपट निर्मिती करणारी कंपनी या क्षेत्रात मुरलेली आहे. वाद होऊच नये यासाठी ते काही पावलं जरुर टाकू शकतात, परंतु शांतपणे रिलीज पार पडले तर त्याचा फायदा उठवता येत नाही, याची पूर्ण जाणीव त्यांना आहे. काहीही करुन चित्रपट चर्चेत राहणं,पब्लिसिटीचा एक भाग असतो. त्यामुळे तेलुगू भाषेत रिलीज झालेला ट्रेलर नकळतपणे लेझीम नृत्यासह रिलीज झाला असेल, यावर विश्वास ठेवता येत नाही. तेलुगू भाषेतील ‘छावा’ चित्रपट 7 मार्चला रिलीज होणार आहे. त्यावेळी या सिनेमात ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे लेझीम नृत्य असणार का नाही, हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा –