रेमो डिसूझाचा वाढदिवस, 'या' गाण्यासाठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार... - REMO DSOUZA BIRTHDAY

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कोरियोग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. रेमो 2 एप्रिल रोजी 51 वर्षांचा झाला आहे. रेमो अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्यानं त्याच्या नृत्य कौशल्यानं लोकांचे खूप मनोरंजन केले आहे. रेमोनं आपल्या नृत्यानं देशातील अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे. आज रेमो फक्त कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक नाही तर, तो मोठ्या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा जज देखील आहे. त्यानं अनेक बॉलिवूड स्टार्सना त्याच्या तालावर नाचवलं आहे. रेमोचं खरं नाव रमेश गोपी नायर आहे आणि त्याचा जन्म बंगळुरूमध्ये झाला होता. रेमो हा पलक्कड (केरळ) येथील एका हिंदू कुटुंबातील आहे. त्याचे वडील रमेश नायर यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली आहे. लग्नानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर रेमोनं आपलं नाव बदलले. रेमोच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी आम्ही त्याच्या काही विशेष पाच गाण्याबद्दल सांगणार आहोत.

रेमो डिसूझाची टॉप 5 कोरिओग्राफ केलेली गाणी :

दिवानी मस्तानी (बाजीराव मस्तानी) : अभिनेता रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा स्टारर ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘दीवानी मस्तानी’ हे हिट गाणं रेमोनं कोरिओग्राफ केलंय. यामध्ये दीपिका पदुकोणनं खूप सुंदर नृत्य केलंय. यासाठी, रेमोला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी 63वा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. या गाण्याला श्रेया घोषालनं गायलं आहे.

सुन साथिया (एबीसीडी 2) : रेमो डिसूझानं स्वतःच्या दिग्दर्शित ‘एबीसीडी 2’ या चित्रपटात कोरिओग्राफरची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील वरुण धवन आणि श्रद्धा कपूर अभिनीत ‘सुन साथिया’ हे गाणं रेमोनं कोरिओग्राफ केलं होतं, जे खूप लोकप्रिय झालं होतं.

बदतमीज दिल (ये जवानी है दिवानी) : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘बदतमीज दिल’ हे एक पार्टी सॉन्गआहे. हे गाणे अजूनही हिट आहे. रणबीर कपूरचे चाहते या गाण्याच्या प्रत्येक स्टेपवर नाचतात. हे गाणं देखील रेमो डिसूझानं कोरियोग्राफ केलंय.

घर मोरे परदेसिया (कलंक) : वरुण धवन आणि आलिया भट्ट स्टारर ‘कलंक’ या चित्रपटातील ‘घर मोर परदेसिया’ या गाण्यातील आलिया भट्टचा डान्स पाहण्यासारखा आहे. यात माधुरी दीक्षित देखील आहे. हे गाणं देखील रेमो डिसूझानं कोरियोग्राफ केलं आहे.

डिस्को दिवानं (स्टुडंट ऑफ द इयर) : 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधील ‘डिस्को दिवाने’ हे गाणं देखील रेमोनं कोरिओग्राफ केलंय. कॉलेज पार्टी थीम सॉन्गमध्ये आलिया, वरुण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्यांच्या कॉलेज मित्रांबरोबर नाचताना दिसले आहेत.

हेही वाचा :

  1. कपिल शर्मासह ‘या’ स्टार्सला मिळाली जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आलेला ईमेल चर्चेत
  2. कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नीवर डान्स ग्रुपनं केला फसवणुकीचा आरोप…
  3. Remo Dsouza Brother In Law Suicide : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाच्या मेहूण्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Source link