महाराष्ट्राची शान आणि लोककलेचा अभिमान असणाऱ्या पारंपरिक लावणीची पताका नव्या पिढीतील तरुणींनी फडकत ठेवावी, असे आवाहन लावणी अभ्यासक प्रा. डॉ. शाहीर शेषराव पठाडे यांनी केले.
.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित १० दिवसीय निवासी लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिराच्या संचालिका लावणी सम्राज्ञी राजश्री काळे नगरकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर, ज्येष्ठ हार्मोनियम वादक लक्ष्मण भालेराव व शिबिर समन्वयक भगवान राऊत आदी या वेळी उपस्थित होते. शिबिरार्थींना पारंपरिक लावणीबद्दल मार्गदर्शन करताना पठाडे म्हणाले, की लावणीचे मूळ, संत-पंत काव्यात आहे. पेशवाईच्या काळात लावणी बहरली. शाहीर पठ्ठे बापूराव, शाहीर होनाजी बाळा, सगन भाऊ यांच्याबरोबरच पंढरपूरच्या ज्ञानोबा उत्पात यांनीही अनेक लावण्या लिहिल्या आणि या लावण्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधनही केले. रोशन सातारकर, यमुनाबाई वाईकर, सुलोचना चव्हाण, सत्यभामा पंढरपूरकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, लीला गांधी, मधू कांबीकर, राजश्री काळे नगरकर, आरती काळे नगरकर अशा अनेक लावणी सम्राज्ञींनी महाराष्ट्राला लावणीचे वैभव प्राप्त करून दिले. त्या पारंपरिक लावणीचे जतन आणि संवर्धन करणे, तुमच्या हातात आहे. या शिबिराच्या माध्यमातून आगामी काळात अनेक लावणी कलावंत घडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. पठाडे यांनी लावणीसम्राट गुरु ज्ञानोबा उत्पात यांच्या ‘वाटलं होतं तुम्ही याल’, ‘नुसतं हसून राया चालायचं नाही’, ‘चला जेजुरीला जाऊ’ या पारंपरिक लावण्या ठसक्यात सादर करून शिबिरार्थींची मने जिंकली. शाहीर पठ्ठे बापूरावांच्या ‘आधी गणाला रणी आणा हो’ आणि ‘नमुया आधी देश भारती’ या गणाने त्यांनी सप्रयोग व्याख्यानास प्रारंभ करून लावणीचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी यांच्या हस्ते प्रा. डॉ. शेषराव पठाडे यांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. शेषराव पठाडे यांनी आपली ग्रंथसंपदा ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी व लावणीसम्राज्ञी राजश्री काळे नगरकर यांना भेट दिली.