ladki bahin yojana: महाराष्ट्रात महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला २३२ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून ५० जागाही मिळाल्या नाहीत. या निवडणूक जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यामुळे आता २१०० रुपये कधीपासून मिळणार, त्याचे वेध बहिणींना लागले आहे. त्याबाबत महिला ब बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली.
आदिती तटकरे सभागृहात काय म्हणाल्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा जाहिरनामा हा 5 वर्षांचा असतो. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र सध्या 2100 रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळे लाडक्या बहिणांनी 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे. आदिती तटकरे यांच्या सभागृहातील वक्तव्याने लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली आहे. परंतु सर्व महिलांना फेब्रुवारी आणि मार्च माहिन्याचा 1500 असा दोन महिन्यांचा हप्ता म्हणजे 3000 रुपये महिला दिनापूर्वी मिळणार आहे.
हे सुद्धा वाचा
निकषांमध्ये कोणताही बदल नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. संपूर्ण प्रक्रिया आणि कार्यवाही याच निकषांनुसार पार पडत असल्याचे महिला ब बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात सांगितले. या चर्चेत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, अशोक उर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, चित्रा वाघ यांनी सहभाग घेतला.
अर्जाची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया
योजनेच्या अटी शर्तीनुसार लाभार्थी महिलांसाठीची पात्रता व अपात्रता ठरवण्यात आली आहे. त्याच निकषांनुसार अर्जांची छाननी करण्यात येत आहे. कोणत्याही योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. त्यानुसार ज्या लाभार्थी महिला निकषांची पूर्तता करीत नाहीत त्यांना या योजनेचा आर्थिक लाभ अदा न करण्याच निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज नोंदणी केली असून त्यापैकी सद्यस्थितीत 2 कोटी 52 लाख महिल पात्र ठरत आहेत.
काय आहेत निकष
लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेंतर्गत विचार केला जात नाही.