महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरत आली आहे. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देण्यात येतील असं जाहीर केलं होतं. मात्र हे 1500 चा हप्ता 2100 कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती. मात्र अद्यापही त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर निर्णय होईल अशी आशा असतानाच 2100 रुपयांबद्दल मंत्री अदिती तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
अधिवेशनात भाषण करताना अदिती तटकरे म्हणाल्या की, आम्ही महिलांना 100 टक्के 2100 रुपये देणार आहोत. पाच वर्षांसाठी जाहीरनामा तयार केलेला असतो. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून योजनेवर टीका सुरू आहे. ही योजना लाडक्या बहिणींची सर्वात आवडती योजना ठरली. म्हणून कुठेतरी पहिल्या महिन्यात पावणेदोन कोटी महिलांना लाभ मिळाला. तर निवडणुकीनंतर 2 कोटी 45 लाख महिलांना लाभ मिळाला. आता 2 कोटी 52 लाख महिलांना लाभ देणार आहोत. निवडणुकीच्या आधी वेगळी निवडणुकीनंतर वेगळी अशी भूमिका आम्ही घेतलेली नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही यांनी याच अधिवेशनात 2100 रुपये महिलांना देणार असे वक्तव्य कुठेच केले नाही, असं मंत्री अदिती तटकरे यांनी म्हंटलं आहे.